राजगुरूनगरच्या तिन्हेवाडी रोडवर स्वखर्चाने दोन गतिरोधक; सोमनाथ ढोले यांचा पुढाकार
अपघात रोखण्यासाठी नागरिकांची मागणी; स्वराज्य पक्षाचे सोमनाथ ढोले यांचा स्वखर्चाने पुढाकार, तिन्हेवाडी रोडवर दोन प्लास्टिक गतिरोधक बसवले
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर शहरातील तिन्हेवाडी रोड हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाढती वाहतूक आणि वाहनांचा वेग यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांकडून गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात होती.
नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ नारायण ढोले यांनी पुढाकार घेत तिन्हेवाडी रोडवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वखर्चाने दोन ठिकाणी प्लास्टिकचे गतिरोधक बसविले. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होण्यास मदत होणार असून पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
सोमनाथ ढोले यांनी यापूर्वीही राजगुरूनगर शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार स्वखर्चाने गतिरोधक बसविले आहेत. प्रशासनाकडे मागणी करूनही आवश्यक कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी स्वतःच्या खर्चातून हा उपक्रम राबविला.
यावेळी तिन्हेवाडी रोड परिसरातील नागरिक तसेच स्वराज्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी गतिरोधक बसविल्याबद्दल समाधान व्यक्त करत ढोले यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. दरम्यान, नवीन रस्त्यांच्या कामाच्या निविदेतच गतिरोधकांची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे सोमनाथ ढोले यांनी सांगितले.
“प्रशासनाने ज्या वेळी नवीन रस्ते तयार होतात, त्याच वेळी त्या रस्त्याच्या निविदेमध्ये गतिरोधक बनवण्याची तरतूद केली पाहिजे. म्हणजे नंतर गतिरोधकासाठी वेगळा निधी मिळेपर्यंत नागरिकांना वाट पाहावी लागणार नाही. नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.”
— सोमनाथ नारायण ढोले
सदस्य, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी
तिन्हेवाडी रोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेता केवळ गतिरोधक बसविण्यापुरते मर्यादित न राहता रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन, वेग नियंत्रण आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरजही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.