Political Khed work credit | कामांच्या श्रेयावरून खेड तालुक्यात राजकीय वाद; शरद बुट्टे पाटील यांची सोशल मीडियातून टीका
कामे मंजूर होण्यासाठी पाठपुरावा आमचा, मात्र सोशल मीडियावर श्रेय घेण्यासाठी काहींची चढाओढ – शरद बुट्टे पाटील
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात विविध विकासकामांच्या श्रेयावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून माजी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना काही लोकप्रतिनिधी आणि नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. विकासकामे मंजूर होण्यामागे दीर्घ पाठपुरावा, प्रस्ताव आणि अधिकृत प्रक्रिया असते.मात्र काही जण केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक विकासकाम मंजूर होण्यामागे एक निश्चित प्रक्रिया असते. संबंधित कामाचा प्रस्ताव, शिफारस, पाठपुरावा आणि त्यासंबंधीचा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध असतो. त्यांनी नमूद केले की, संबंधित दोन विकासकामे पुणे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील २० टक्के समाज कल्याण निधीतून शिफारस करून मंजूर करण्यात आली आहेत.
बुट्टे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मार्च अखेरीस अंतिम सुधारित अर्थसंकल्पात समाज कल्याण विभागासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर समाज कल्याण सभापती यांनी सदस्यांच्या शिफारशी विचारात घेऊन ही कामे मंजूर केली आहेत.
बुट्टे पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रत्येक सदस्याला १० लाख रुपयांचे एक काम मंजूर करण्यात आले होते. मात्र बुट्टे पाटील यांनी विशेष आग्रह धरल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व समाज कल्याण सभापती यांनी आपल्या अधिकारातील निधीतून अतिरिक्त एक काम मंजूर करून दिले.
दरम्यान, पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या कामांच्या प्रशासकीय प्रक्रियेला काहीसा विलंब झाला. आता ही कामे ई-निविदा प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले की, अलीकडच्या काळात खेड तालुक्यात एखादे काम मंजूर करून आणले आणि त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली की काहीजण त्याची नक्कल करून स्वतःच्या नावाने प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करतात. अशा नेत्यांनी संबंधित काम कोणत्या निधीतून मंजूर झाले, त्यासाठी प्रस्ताव कोणी दिला, शिफारस पत्र कोणाचे आहे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी झाली याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
"आम्ही कधीही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा किंवा त्याचे बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमच्या प्रत्येक कामाचा संपूर्ण पत्रव्यवहार आणि अधिकृत नोंदी आमच्याकडे उपलब्ध आहेत," असेही बुट्टे पाटील यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
शरद बुट्टे पाटील यांच्या या पोस्टमुळे खेड तालुक्यातील विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेल्या राजकीय स्पर्धेला पुन्हा एकदा तोंड फुटले असून संबंधित नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
