निघोजेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मारुती गणपत येळवंडे यांचे निधन; गावावर शोककळा
खेड तालुक्यातील निघोजे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व हाडाचे शेतकरी मारुती गणपत येळवंडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील निघोजे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हाडाचे शेतकरी आणि धार्मिक-आध्यात्मिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले मारुती गणपत येळवंडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निघोजे गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मारुती येळवंडे यांनी आयुष्यभर शेती करताना सामाजिक बांधिलकी जपली. गावातील धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्यावर निघोजे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. खेड तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप येळवंडे यांचे ते वडील होत.
मारुती गणपत येळवंडे यांच्या निधनाने निघोजे गावाने एक कर्तृत्ववान, सामाजिक जाण असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.