Manchar Theft Case | मंचरमध्ये गोडाऊन फोडून लाखोंची चोरी; CCTV फुटेजवरून आरोपी ताब्यात, ७.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला यश; पितळ-कांब्याच्या धातूंसह वाहन पोलिसांच्या ताब्यात

Manchar Theft Case | मंचरमध्ये गोडाऊन फोडून लाखोंची चोरी; CCTV फुटेजवरून आरोपी ताब्यात, ७.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

महावार्ता लाईव्ह | मंचर परिसरातील गोडाऊन फोडून पितळ-कांब्याच्या धातूच्या वस्तूंसह CCTV यंत्रणा चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि मंचर पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत पोलिसांनी श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

 

फिर्यादी सुमीत जेठमल (पुनामिया, रा. जुना बाजारपेठ, मंचर) यांच्या मंचर, ता. आंबेगाव येथील भांड्यांच्या पत्राशेड गोडाऊनचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमध्ये ठेवलेला जुना तांबा-पितळ भांड्यांचा स्क्रॅप तसेच Hikvision कंपनीचे CCTV DVR मशीन असा लाखो रुपयांचा माल चोरून नेला होता.

 

या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून (१० ऑगस्ट) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीच्या या घटनेचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढण्यात आला. या तपासातून आरोपी हे श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

 

यानंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोफियान मुस्ताक शेख (वय २४ वर्षे, रा. वॉर्ड नं. २, बजरंग चौक, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मंचर येथील आरोपी असलम नायकवाडी व इतर आरोपींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली केले.

 

पुढील तपासात पोलिसांनी चोरीस गेलेल्या मालापैकी २१७ किलो ग्रॅम वजनाची पितळी धातूची मोड आणि ३५८ किलो ग्रॅम वजनाची तांब्याची धातूची मोड हस्तगत केली. या धातूची किंमत ५ लाख ३६ हजार २०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे, पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात एकूण ७ लाख ८६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. 


ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, पोलीस हवालदार अतुल डेरे, हनुमंत ढोबळे, राजू मोमीन, स्वप्निल गाडवे, भारत मोहोळ, तसेच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुदाम घोडे, संजय नाडकर, योगेश रोडे आणि अजित पवार यांनी सहभाग घेतला.