भामचंद्र डोंगराच्या विकासासाठी इको-टुरिझमचा प्रस्ताव; सप्ताह समितीचे वन विभागाला निवेदन

संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमीच्या विकासासाठी सप्ताह समितीचे वन विभागाला निवेदन; रस्ता, दगडी पायऱ्या, सोलर लाईट व पॅगोडासह विविध सुविधांची मागणी

भामचंद्र डोंगराच्या विकासासाठी इको-टुरिझमचा प्रस्ताव; सप्ताह समितीचे वन विभागाला निवेदन

 

महावार्ता लाईव्ह | जगतगुरु संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी म्हणून खेड तालुक्यातील भांबोली-वासुली येथील श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराची ओळख आहे.या डोंगराचे परीसरात इको - टुरीझम मधून काही  भाविकांच्या दृष्टीने अनेक सुख सुविधा अशी विकासात्मक कामे करावी.अशी मागणी येथे कार्यरत असलेल्या श्री क्षेत्र भामचंद्र सप्ताह समितीने चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

 


भामचंद्र डोंगर हा निसर्गरम्य वारसा स्थळ असून, सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हा डोंगर सुमारे दीडदोन हजार फूट उंचीचा कातळकडा आहे.डोंगराच्या मध्यभागी असलेल्या गुहेत जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी तपश्चर्या करून भगवान पांडुरंगाचा साक्षात्कार घेतल्याची आख्यायिका आहे.त्यामुळे या स्थळाला 'साक्षात्कार भूमी' म्हटले जाते. याशिवाय, डोंगरावर पांडवकालीन गुहा व प्राचीन शिवलिंग असलेले महादेव मंदिरही आहे.


श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराचे परिसरात अनेक प्रकारची लहान मोठी झाडे असून डोंगर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.जमीन सपाटीपासून डोंगर उंच असून डोंगराचे मध्यभागी कपारीत जगतगुरु संत तुकाराम महाराजांची तपश्चर्या करण्याची जागा (गुहा) आजही सुरक्षित आहे.तसेच डोंगराचे कपारीत (गुहेत) शिवलिंग असलेले प्राचीन काळातील पांडवकालीन शिव मंदिर आहे. डोंगराचे जमीन सपाटीपासून थेट साक्षात्कार भूमीपर्यंत जाण्यासाठी भाविकांना रस्त्यासह अन्य सुविधा उपलब्ध नाहीत. सुविधांअभावी भामचंद्र डोंगर दुर्लक्षित राहिला आहे. 

 

जाहिरात 


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी तर साधक मंडळी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात.डोंगराचे पायथ्याशी लोकवर्गणीतून हनुमानाचे  मंदिर उभारले आहे.याच परिसरात दरवर्षी सप्ताह आयोजित केला जातो.सप्ताहातील कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी या ठिकाणी अवतरते.तसेच अनेक महान कीर्तनकारांची या सप्ताहात किर्तनरुपी सेवा झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या सप्ताहाला भाविक भक्तांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
 

डोंगराचे परिसरात भाविकांचे दृष्टीने विकासात्मक काही  महत्वपूर्ण कामे व्हावीत यासाठी श्री क्षेत्र भामचंद्र सप्ताह समितीच्या वतीने चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर या भागातील वनपाल पवन आहेर व ओम पवार यांनी सप्ताह समिती पदाधिकारी यांचे समवेत डोंगर परीसराची पाहणी केली.
             
विकासात्मक होणारी कामे 

१) भाविकांसह वारकरी साधकांना डोंगरावर जाणेसाठी त्रास होऊ नये म्हणून डोंगर पायथा भागात डांबरीकरण रस्ता.
२) डोंगरावर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचे बांधकाम
३) वारकरी व पर्यटकांसाठी पॅगोडाची निर्मिती 
४) रस्याच्या कडेला सोलर लाईट सिस्टीम
५) अनावश्यक जंगली झाडे कमी करून औषधी वनस्पती व हरित वनझाडांची लागवड
अशी अनेक कामे निसर्गाला धक्का न लावता आपल्याला करता येतील असे उपस्थित भामचंद्र डोंगर सप्ताह समितीतील अनेक सदस्यांनी सूचित केले. पवित्र स्थान असलेले श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर सुरक्षित राहण्यासाठी सप्ताह समिती अधिक दक्ष आहे.