चाकणच्या खड्ड्यांवर राजकीय ‘राडा’! नेते मैदानात, शिंदेंचा M-60 फॉर्म्युला चर्चेत; पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाहणी दौऱ्याला विलंब का?

चाकण एमआयडीसीतील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीवरून राजकीय वातावरण तापले; एकनाथ शिंदेंची प्रत्यक्ष पाहणी आणि M-60 प्रीकास्ट फॉर्म्युल्याची चर्चा, तर पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाहणी दौऱ्याला विलंब का? यावर चाकणकरांमध्ये सवाल.

चाकणच्या खड्ड्यांवर राजकीय ‘राडा’! नेते मैदानात, शिंदेंचा M-60 फॉर्म्युला चर्चेत; पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाहणी दौऱ्याला विलंब का?

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याची औद्योगिक ओळख असलेल्या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था,रस्त्याला पडलेले खड्डे आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे उद्योजक,कामगार, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. वर्षानुवर्षे या समस्येवर बैठका, आश्वासने आणि पाहणी दौरे होत असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत अपेक्षित बदल होत नसल्याने आता चाकणच्या प्रश्नाला राजकीय रंग चढला आहे. चाकणच्या रस्त्यांसाठी कोण किती गंभीर आहे, याचीच जणू राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे.

 

पालकमंत्री असूनही प्रत्यक्ष पाहणीला विलंब का?

पुण्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण एमआयडीसीतील खराब रस्ते,वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नाची दखल घेत १४ ऑगस्ट रोजी त्यांनी चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर एमआयडीसी, जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए, पोलीस, चाकण नगरपरिषद व  संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या.तसेच उद्योजक, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

 

पुण्याच्या पालकमंत्री असतानाही सुनेत्रा पवारांकडून चाकणसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातील रस्ते आणि वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यास विलंब का होत आहे? हा प्रश्न आता चाकण एमआयडीसी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे इतर राजकीय नेते चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष येऊन पाहणी करत असताना पालकमंत्र्यांच्या प्रत्यक्ष दौऱ्याला होत असलेला विलंब राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरत आहे.

 

अजितदादांचा पहाटेचा पाहणी दौरा आजही चर्चेत

चाकणच्या रस्ते आणि वाहतूक प्रश्नाचा विषय निघाला की अजित पवार यांच्या पूर्वीच्या पहाटेच्या पाहणीची आठवण अनेक तालुक्यातील नेते, नागरिक व उद्योजक व चाकणकर  काढतात. मागील काळात अजितदादा पहाटेच अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन चाकणमध्ये दाखल झाले होते. महत्त्वाच्या चौकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन वाहतूक कोंडीचे रस्ते, चौक आणि नागरिकांच्या अडचणींची पाहणी केली होती. यावेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांना जागेवरच आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.

 

त्यामुळे आजच्या परिस्थितीत ‘अजितदादांसारखी पहाटेची धडक पाहणी आता कधी आणि कोण करणार ?’ अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनीही प्रत्यक्ष चाकणमध्ये उतरून परिस्थितीचा आढावा घ्यावा,अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

उदय सामंत, आदित्य ठाकरे, रोहित पवार थेट एमआयडीसीत

चाकणच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत, उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शप) रोहित पवार यांनी प्रत्यक्ष चाकण एमआयडीसीमध्ये येऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे चाकणचा प्रश्न आता केवळ स्थानिक प्रशासनाचा राहिलेला नसून राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.

 

एकीकडे महाविकास आघाडीतील सत्ताधारी नेते चाकणच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे विरोधक आणि इतर राजकीय नेतेही प्रत्यक्ष पाहणी करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे चाकण एमआयडीसी रस्त्यांचा प्रश्न आगामी काळात राजकीयदृष्ट्या अधिक तापण्याची शक्यता आहे.

 

एकनाथ शिंदेंकडून पाहणी अन् अडीच तासांची बैठक

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी  चाकण एमआयडीसी समस्यांवर तब्बल अडीच तास ऑनलाइन बैठकीला उपस्थिती लावून त्यांनी प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर रविवारी (दि.२३)  स्वतः चाकण एमआयडीसीत येऊन खराब  रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रस्ते, वाहतूककोंडी आणि पायाभूत सुविधांबाबत परिस्थिती जाणून घेतली.जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामांमध्ये दिरंगाई न करता उपाययोजना त्वरित  करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे चाकणच्या मुख्य प्रश्नावर ‘बैठकीपासून थेट रस्त्यावर’ अशी शिंदेंची भूमिका पाहायला मिळाली.

 

उपमुख्यमंत्री शिंदेंचा M-60 प्रीकास्ट फॉर्म्युला चर्चेत

चाकणच्या रस्त्यांची समस्या केवळ खड्डे बुजवून संपणारी नाही. तर मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक,औद्योगिक परिसरातील सतत वाहतूककोंडीचा ताण आणि पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था पाहता अधिक टिकाऊ उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर M-60 प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पर्याय शिंदेकडून चर्चेत आला आहे.नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे अधिक जलद आणि टिकाऊ करण्याचा प्रयत्न झाल्यास चाकणसारख्या औद्योगिक परिसराला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शिंदेंच्या  ‘M-60 या फॉर्म्युलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

आता बैठका नकोत, प्रत्यक्ष काम हवे

चाकण एमआयडीसी प्रश्नांवर आजवर अनेक बैठका झाल्या, अनेक नेत्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. काम सुद्धा सुरु झाले असले तरी मात्र, चाकणच्या एमआयडीसीतील प्रश्न साधा आहे —रस्त्यांवरील संपूर्ण खड्डे कधी बुजविणार? वाहतूककोंडी कधी सुटणार ?  आणि चाकण औद्योगिक क्षेत्राला कायमस्वरूपी सक्षम रस्ते कधी मिळणार? 

 

उदय सामंत, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे दौरे, सुनेत्रा पवारांकडून प्रशासनाला दिलेल्या सूचना आणि एकनाथ शिंदे यांची अडीच तासांची बैठक तसेच प्रत्यक्ष पाहणी या सगळ्या घडामोडींमुळे चाकणचा रस्ता प्रश्न आता राजकीय इच्छाशक्तीची कसोटी बनला आहे.


पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रत्यक्ष चाकण पाहणीला नेमका विलंब का होतोय, याची चर्चा सुरू असतानाच आता उद्योजक,कामगार,नागरिक आणि चाकणकरांची अपेक्षा एकच नेते कितीही आले,पाहणी कितीही झाली; पण आतातरी  रस्त्यावरचा खड्डा कायमचा बुजला पाहिजे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे..!