Crime Robbery | तंबाखूची पुडी मागण्याचा बहाणा; वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास

खेड तालुक्यातील चासजवळील गुंजवठा फाट्यावर दिवसाढवळ्या घटना; सुमारे चार लाखांचा ऐवज घेऊन दुचाकीस्वार फरार

Crime Robbery | तंबाखूची पुडी मागण्याचा बहाणा; वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील चासजवळील गुंजवठा फाटा येथे तंबाखूची पुडी मागण्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे चास व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

तंबाखू मागितली आणि दागिने हिसकावले

गुंजवठा फाटा येथील अमोल डेअरीसमोर ७५ वर्षीय सुभद्रा बबन रासकर यांची टपरी आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून आलेले दोन तरुण टपरीजवळ थांबले. त्यापैकी एकाने खाली उतरून तंबाखूची पुडी मागितली. महिला ग्राहकाला वस्तू देत असतानाच त्याने त्यांच्या गळ्यातील तीन पदरी सोन्याचे मणी असलेली पानपोत व सोन्याचा डोळा असा साडेतीन तोळ्यांचा ऐवज हिसकावून घेतला आणि साथीदारासह दुचाकीवरून पळ काढला.

 

सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी हिसकावून नेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

 

घटनास्थळी पोलिसांची धाव

माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र वृत्त लिहिपर्यंत आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

 

नागरिकांमध्ये वाढली असुरक्षिततेची भावना

अलिकडच्या काळात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी राजगुरुनगरजवळील होलेवाडी परिसरातही अशाच प्रकारे दुकानात वस्तू घेण्याचा बहाणा करून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेण्यात आली होती. त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच चास परिसरात पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

 

चोरट्यांच्या नव्या शक्कलींमुळे चिंता

महिलांना गाफील ठेवून विविध बहाण्यांनी त्यांच्याजवळ जाणे आणि क्षणार्धात सोन्याचे दागिने लंपास करणे, ही चोरट्यांची नवी पद्धत बनत चालली आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली असून पोलिसांनीही गस्त वाढवून अशा टोळ्यांवर लगाम घालण्याची मागणी परिसरातून होत आहे.