Special report | मुख्यमंत्र्यांचे 'प्रपोजल' आणि पक्षाच्या वर्धापनदिनाला काळेंची अनुपस्थिती; खेडच्या राजकारणात नवा सस्पेन्स! 

प्रपोजल विकासाचे की राजकारणाचे ? काळेंभोवती फिरतेय  चर्चांचे वादळ; खेड तालुक्यात तर्क-वितर्कांना आले उधाण ; फडणवीसांच्या एका वक्तव्याने सुरू झालेली चर्चा पुन्हा पुन्हा का रंगली ?

Special report | मुख्यमंत्र्यांचे 'प्रपोजल' आणि पक्षाच्या वर्धापनदिनाला काळेंची अनुपस्थिती; खेडच्या राजकारणात नवा सस्पेन्स! 

 

महावार्ता लाईव्ह | स्पेशल रिपोर्ट

खेड तालुक्याच्या राजकारणात सध्या एका "प्रपोजल"ची जोरदार चर्चा रंगली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि खेडचे आमदार बाबाजी काळे एकत्र उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचा सामूहिक फोटो काढला जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहजपणे केलेले एक वक्तव्य अचानक चर्चेचा विषय ठरले. "आम्ही बाबाजी काळे यांना यापूर्वीच एक प्रपोजल दिले आहे," असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे उपस्थितांनी ऐकले आणि तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा एकच भडका उडाला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ,याबाबत अनेक तर्क-वितर्क आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

काळेंनी दिले स्पष्टीकरण... पण चर्चा थांबली नाही

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या चर्चेनंतर दोन दिवसांनी आमदार बाबाजी काळे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना या "प्रपोजल"चा संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, भीमाशंकर परिसरातील विविध विकासकामांबाबत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने हे वक्तव्य झाले होते. कोणताही राजकीय अर्थ त्यातून काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.काळे यांच्या स्पष्टीकरणानंतर हा विषय संपेल असे वाटत असतानाच पुढील घटनांनी पुन्हा या चर्चेला नवे आयाम दिले.

 

मोहिते पाटलांचे भाष्य; चर्चेला मिळाले राजकीय वळण

राजगुरूनगर येथे पीडीसीसी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही प्रपोजल या विषयावर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या "प्रपोजल"चा उल्लेख करताना आमदार काळे यांच्यावर  टीकात्मक टिप्पणी केली. राजकीय विरोधकांकडून या विषयाचा उल्लेख होऊ लागल्याने केवळ मिश्किल टिप्पणी किंवा विकासकामांचा संदर्भ म्हणून हा विषय राहिला नाही.उलट त्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत का, याबाबत चर्चेला खतपाणी मिळत आहे.

 

आणि मग आला वर्धापन दिन...

दरम्यान, मुंबई येथे १९ जून २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ६० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यभरातून हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमातून आपली आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली.मात्र या मोठ्या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे आमदार बाबाजी काळे अनुपस्थित असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा "त्या प्रपोजल"ची आठवण राजकीय वर्तुळात ताजी होत आहे.

 

अनुपस्थितीमुळे वाढले चर्चांना पंख

पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला एखाद्या विद्यमान आमदाराची अनुपस्थिती ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते.त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रपोजल या वक्तव्याची पार्श्वभूमी असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.राज्यात अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चा राज्यात सुरू असताना आमदार बाबाजी काळे हे पक्षाच्या वर्धापन दिनाला गैरहजर राहिल्याने विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.

 

लग्नसमारंभाचे कारण; तरीही प्रश्न कायम

१९ जून हा मोठा विवाह मुहूर्त असल्याने आमदार बाबाजी काळे हे खेड तालुक्यातील विविध विवाह सोहळ्यांना उपस्थित होते. त्यामुळे ते मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाला जाऊ शकले नसल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. मात्र  पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमापेक्षा स्थानिक कार्यक्रमांना प्राधान्य का देण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

नेमकं शिजतंय तरी काय?

मुख्यमंत्र्यांचे "प्रपोजल", त्यानंतर आमदार काळेंचे स्पष्टीकरण, माजी आमदार मोहिते पाटील यांची टिप्पणी आणि त्यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनातील अनुपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.आता सध्या तरी या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नाही. मात्र राजकारणात अनेकदा संकेत आधी मिळतात आणि घोषणा नंतर होतात, त्यामुळे आगामी काळात आमदार बाबाजी काळे यांच्या भूमिकेकडे खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार यात शंका नाही.

 

चर्चेचा केंद्रबिंदू एकच...

मुख्यमंत्र्यांनी दिलेले ते "प्रपोजल" केवळ विकासकामांपुरते होते की त्यामागे राजकीय अर्थ दडलेला होता? या प्रश्नाचे उत्तर काळच देणार आहे. मात्र सध्या तरी खेड तालुक्याच्या राजकारणात "प्रपोजल" हा शब्द सर्वाधिक चर्चेत असल्याचे चित्र आहे.