विद्यार्थ्यांशी मुक्त संवादातून ‘बालस्नेही गाव’ घडविण्याचा संकल्प; ५ सप्टेंबरपासून विशेष अभियान
खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातील ४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘ज्ञानसंस्कार’ पुस्तिका पोहोचणार; विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी साधला जाणार थेट संवाद
महावार्ता लाईव्ह | भौतिक सुविधांच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देत त्यांना शिक्षण, संस्कार, आरोग्य, सुरक्षितता आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनापासून या अभियानाला सुरुवात होणार असून, या माध्यमातून जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्य सुनीता शरद बुट्टे पाटील या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
वित्त आयोगाच्या निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा, या उद्देशाने ‘बालस्नेही गाव’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सूचना जाणून घेण्याबरोबरच शाळा व गाव विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना ‘ज्ञानसंस्कार’ ही सचित्र हस्तपुस्तिका देण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त ठरेल अशा विविध विषयांचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
व्यक्तिमत्व विकासापासून करिअरच्या संधींपर्यंत मार्गदर्शन
‘ज्ञानसंस्कार’ पुस्तिकेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी संस्कार, व्यक्तिमत्व विकास, योगा व प्राणायाम, विविध खेळ, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेची तयारी, दहावी-बारावीनंतरच्या शिक्षणाच्या संधी, संगणक साक्षरता तसेच राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय ‘बालस्नेही गाव’ संकल्पनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही पुस्तिकेत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणागीते आणि प्रार्थनांचाही समावेश करण्यात आला आहे.
विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा
मानवी विकास आणि शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत ‘बालस्नेही गाव’ ही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. केवळ रस्ते, इमारती, पाणी किंवा इतर भौतिक सुविधांचा विकास न करता बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, सुरक्षितता आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग निश्चित करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.
पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळा तसेच गावाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ लाभार्थी न ठेवता विकास प्रक्रियेतील सक्रिय सहभागी बनविण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत पुस्तिकेचे प्रकाशन
या उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ज्ञानसंस्कार’ या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.ही पुस्तिका विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केला.
५ सप्टेंबरपासून अभियानाला सुरुवात
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबरपासून या विशेष उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच शाळा आणि गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.“विद्यार्थी हा विकास प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे.भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सूचना ऐकून त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवित आहोत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्या व पाईट आंबेठाण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.