Hutatma Shivram Hari Rajguru | २३ मार्च - शहीद दिवस : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा धगधगता इतिहास !
राजगुरूनगरच्या भीमानदीकाठच्या वीरपुत्राची अमर गाथा ; पुण्याच्या मातीतील वीर: हुतात्मा शिवराम राजगुरू यांचे जीवन आणि अजरामर त्याग ; लाला लजपतरायांच्या बदल्यासाठी राजगुरूंनी घेतलेला साँडर्स वध
हुतात्मा राजगुरू यांना त्रिवार वंदन...!
ये मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भर लो पाणी।
जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी।।
भारत देश स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महामेरू क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरि राजगुरू होय. २३ मार्च हुतात्म्यादिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन.
लता मंगेशकरांच्या गीतातील देशभक्तीचा संदेश
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्ध प्रसंगी वरील काव्य पंक्तीचे गायलेले हे अजरामर गीत देशवासीयांना प्रेरणादायी ठरले. या देशभक्तीपर भावस्पर्शी गीताने देशाला एक संदेश मिळाला. देश स्वातंत्र्यासाठी बलिदान केले त्या थोर क्रांतीवीरांचे व त्यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून देशात २३ मार्च हा दिवस शहीद दिवस साजरा केला जातो.
त्रिमूर्तींची शहादत: भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू
यादिनी क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरू, शहीद भगतसिंग व सुखदेव या त्रिमूर्तींना जुलमी ब्रिटीश सरकारने लाहोर येथील तुरुंगात मृत्यूदंड अर्थात फाशीची शिक्षा दिली.
हुतात्मा राजगुरू यांची कौटुंबिक पार्श्वभूमी..
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील भीमानदी काठी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा भव्य वाडा आहे. याच ठिकाणी २४ ऑगस्ट १९०८ (शके १८३० श्रावण वद्य सोमवार) या दिवशी राजगुरूंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरि व आईचे नाव पार्वतीबाई होते. या उभयतांना शिवराम व दिनकर या दोन पुत्रांसह चंद्रभागा, वारूताई, गोदावरी या तीन कन्या होत्या. यात सर्वात लहान राजगुरू होते. त्यांना काही शिवराम पंत तर काहीजण प्रेमाने बापू म्हणत होते.
काशीतील व्यायामशाळा आणि क्रांतीचा प्रवास
काशी येथे भारतसेवा व्यायाम मंडळ या नावाने व्यायामशाळा चालत असे. तेथील प्रमुख रावसाहेब कुदळे होते. ते स्वतः लाठी, काठी, दांडपट्टा, नेमबाजी व तलवारबाजी इत्यादी खेळात निष्णात होते. काशी येथे आल्यावर राजगुरू हे त्यांचे शिष्य बनले आणि वरील सर्व खेळ त्यांनी आत्मसात केले. तेथेच त्यांचा अन्य क्रांतीकारकांशी परिचय झाला. अंगापिंडाने किरकोळ असणाऱ्या राजगुरूंची उमेद व धडाडी, करारीपणा पाहून भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आदी बरोबर त्यांची गट्टी जमली.
सायमन कमिशन विरोध आणि लाला लजपतराय यांचे बलिदान
दरम्यानचे काळात ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानच्या प्रगतीचा अहवाल घेण्यासाठी जानेवारी १९२८ मध्ये सायमन कमिशन नेमले होते. परंतु या मंडळात एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नसल्याने या कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार टाकला. मुंबईसह अन्य ठिकाणी सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवून "सायमन चलेजाव" अशा घोषणांचा आवाज देशात निनादू लागला.
लाहोर मधून लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशनच्या विरोधात प्रचंड मोर्चा निघाला होता. त्यावेळी पोलिसांनी लोकांना हटविण्याचा अटोकात प्रयत्न केला. परंतू देशातील जनतेचा निर्धार ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला जुमानत नव्हता. परिणामी गोऱ्या पोलिसांनी लाठी हल्ला चालू केला. अमानुष मारहाण होऊ लागली आणि मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लालाजी लजपतराय यांच्या छातीवर जबरदस्त लाठीने घाव बसल्याने ते घायाळ झाले. त्यामध्ये हा पंजाब केसरी १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या रणकंदनात गतप्राण झाले.
लजपतराय हत्येचा बदला: साँडर्स वधाचा कट
लजपतराय यांच्या निधनाचे वृत्त देशभर वाऱ्यासारखे पसरले. हे समजताच चंद्रशेखर, सुखदेव व महावीरसिंग हे लाहोर कैंटोंमेंट मध्ये दाखल झाले. चंद्रशेखर यांचे जवळ १ पिस्तूल व ४ रिव्हॉल्व्हरर्स होती. तसेच संयुक्त प्रांतातून राजगुरू व कुंदनलाल या दोन्ही धाडसी तरुणांनी लाहोर गाठले. तेथील मोझेंक सदनामध्ये या सर्वांची गुप्त बैठक भरली व या सगळ्यांनी आपला थोरनेता लाला लजपतराय यांच्या निर्घुण हत्येचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यांचे हत्येला कारणीभूत झालेला स्कॉट या इंग्रज पोलिस अधिकाऱ्याचा खुनाचा कट रचण्यात आला. या कटाचे नेतृत्व चंद्रशेखर आझाद यांनी स्वीकारले.
साँडर्स वधाची घटना (१७ डिसेंबर १९२८)
१७ डिसेंबर १९२८ ला दुपारी ४.३० चे दरम्यान डेप्युटी पोलिस सुप्रिटेंडट साँडर्स आपले कचेरीतून बाहेर पडताना जय गोपाल यांनी पाहिले आणि ठरल्याप्रमाणे आपल्या साथीदारांना इशारा केला. राजगुरूंना वाटले स्कॉट पोलीस अधिकारी येत आहे, म्हणून क्षणार्धात रिव्हॉल्व्हर काढले आणि अचूक गोळी झाडली. गोळी लागल्याने स्कॉट मोटारसायकल वरून खाली पडला. त्यानंतर भगतसिंगांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. मात्र, आपण टिपलेले सावज हे स्कॉट नव्हते तर त्यांचे सहकारी साँडर्स होते हे नंतर जाहिर झाले. लालाजींना वीर मरण आले, तीच भूमी इंग्रज पोलिस अधिकारी साँडर्स यांच्या रक्ताने न्हावून निघाली. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व चंद्रशेखर हे वायुगतीने फरार झाले. ब्रिटिश सरकारने वरील चौघांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले.
अटक आणि खटला
पुण्यातील दिवेकर नावाचे एक कारकून जे राजगुरूंना जवळून ओळखत होते त्यांनी बक्षिसाचे लालसेपोटी पोलिसांना राजगुरूंची माहिती दिल्याने ३० सप्टेंबर १९२९ रोजी पहाटे पोलिसांनी राजगुरूंना अटक केली. स्मिथ या पोलिस अधिकाऱ्याने राजगुरूंच्या घराची झडती घेतली तेव्हा लोडेड पिस्तुल सापडले. तर लाहोर शहरात बाँब तयार करण्यात मग्न असतांना सुखदेव पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अशा प्रकारे या तिघांनाही ब्रिटिश सरकारने लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद करून ठेवले. तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी १ मे १९३० रोजी हुकूम काढून न्यायालयीन खटला चालविण्याचा आदेश दिला. दीर्घकाळ खटल्याची सुनावणी होऊन २७ ऑक्टोबर १९३० रोजी निकाल जाहिर करण्यात आला की, पंजाब नॅशनल बँकेचा दरोडा आणि डेप्युटी पोलिस सुपरिटेंडंट साँडर्स यांच्या खुनाच्या आरोपाखाली इंडियन पिनल कोड सेक्शन १२१ व १३० च्या कलमानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
अखेरची भेट आणि फाशीची रात्र
अखेरच्या भेटीसाठी क्रांतीकारकांचे नातलग तुरुंगाच्या दारात दाखल झाले. पार्वतीबाई आपल्या लाडक्या शिवरामच्या भेटीसाठी पुण्याहून लाहोरला आल्या. सुखदेवांचे चुलते चितराम आपल्या पुतण्याचे दर्शन घेण्यासाठी आले. परंतु त्यांना भेट नाकारली. कारण राजकैद्यांना आई, वडील, भाऊ, बहिण यांचे शिवाय इतरांना भेटता येणार नाही असा हुकुम काढला होता. सुखदेवच्या काकांना जर पुतण्याची भेट घेता येणार नसेल तर आम्हालाही आमच्या मुलांच्या भेटी घ्यायच्या नाहीत. असे त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना कळविले. शेवटी आपल्या वीरपुत्रांची अखेरची भेट न घेताच ही मंडळी वज्राहूनही कठोर मन करून तुरुंगाच्या दारातून परतली.
फाशी ही सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळी देण्याची प्रथा तेव्हा आणि आजही आहे. फाशीच्या दिवशी रात्र वैऱ्याची आहे, जागा रहा ही आकाशवाणी सरकारने ऐकली. सकाळपर्यंत थांबल्यास आपला फाशी देण्याचा हेतू पूर्ण होईल की नाही याची खात्री इंग्रज सरकारला नसल्याने शेवटी भेदरलेल्या इंग्रज सरकारने प्रथा जुगारून २३ मार्च १९३१ (सोमवार) रोजी काळरात्री सायंकाळी ७.१९ मिनिटांनी फाशीचे कुकर्म केले.
क्रांतिकारकांचा अमर वारसा आणि तरुण पिढीची जबाबदारी
देश स्वातंत्र्यासाठी अतुल पराक्रम या क्रांतीकारकांनी केला. त्यांच्या राष्ट्रप्रेमाने आणि सर्वस्व बलिदानाने नव भारताच्या निर्मितीतील इतिहास घडविला. असंख्य क्रांतीकारकांनी त्यागाच्या बळावर मिळवलेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी २१ व्या शतकातील तरूण पिढीवर आहे. म्हणून त्यांच्यात प्रखर राष्ट्रभक्ती, त्यागी वृत्ती, या शूर विरांच्या हौतात्याने निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
कुसुमाग्रजांच्या कवितेतील भाकीत
कवी कुसुमाग्रजांनी हे भाकीत आपल्या धारदार काव्यातून व्यक्त केले आहे, ते म्हणतात की...
कशास आई, भिजवीशी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात, उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमची पेटताच प्रेते
उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते..
▪️शब्दांकन
अँडव्होकेट डॉ. महादेव बाबुराव घुले [ राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे ]
जय हिंद! जय महाराष्ट्र !!
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या अमर बलिदानाला शतशः नमस्कार.