Pune Kalakendra Firing ; तुळजाभवानी कला केंद्रात पहाटे गोळीबार; महिलांची बैठक लावण्यावरून वाद, तरुण जखमी
चाकणच्या तरुणांशी वादानंतर गोळीबार; एक गोळी तरुणाच्या कमरेला घासून गेली, नारायणगाव पोलिसांचा तपास सुरू
महावार्ता लाईव्ह | पुणे-नाशिक महामार्गालगत कांदळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रात महिलांची बैठक लावण्यावरून झालेल्या वादाला पहाटे गोळीबाराचे गालबोट लागले. या घटनेत ओतूर येथील फिरोज कादिर शेख (वय 31) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकण येथील चार तरुण पहाटेच्या सुमारास तुळजाभवानी कला केंद्रात आले होते. या तरुणांनी मद्यपान केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महिलांची बैठक लावण्याच्या कारणावरून त्यांचा तेथील कामगारांशी वाद झाला.
वाद वाढल्यानंतर स्थानिक कामगारांनी संबंधित तरुणांना कला केंद्राबाहेर काढले. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ चाकण येथील चार तरुणांपैकी एका तरुणाने पिस्तुलातून जमिनीच्या दिशेने गोळीबार केल्याची माहिती आहे.
या गोळीबारातील एक गोळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ओतूर येथील फिरोज शेख यांच्या कमरेला घासून गेली. त्यामुळे ते जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.
गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक चाकणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. घटनेमागील नेमके कारण, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि संशयितांची भूमिका याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, तुळजाभवानी कला केंद्रात यापूर्वीही वादाच्या घटना घडत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन न करता कला केंद्र उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची तक्रारही स्थानिकांकडून केली जात आहे. या सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.