Khed suicide | तुकाईवाडी येथे कंटेनरच्या बॉडीला गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
खेड तालुक्यातील धक्कादायक घटना ; तुकाईवाडी येथे रहस्यमय आत्महत्या: अनोळखी व्यक्तीचा कंटेनरला गळफास
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावाजवळ २२ मार्च २०२६ रोजी सकाळी एका अनोळखी व्यक्तीने कंटेनरच्या बॉडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (२२ मार्च ) सकाळी सुमारे ९ ते १० वाजेच्या सुमारास तुकाईवाडी गावाच्या हद्दीत नवीन बायपास जवळ उभा असलेल्या कंटेनर क्रमांक HR 55 AK 3283 च्या डाव्या बाजूच्या बॉडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेली अवस्था एका अनोळखी व्यक्तीची आढळली.
या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी करण सांडभोर यांनी फोनद्वारे वरची भांबुरवाडी येथील पोलीस पाटील सचिन वाळुंज यांना कळवली. सचिन वाळुंज यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, कंटेनरच्या मागील बॉडीला पाठीमागे लटकलेल्या अवस्थेत ३० ते ३५ वर्षांच्या वयाचा अनोळखी इसम दिसला.
मृत व्यक्तीच्या अंगावर फुल बाह्यांचा निळ्या आणि गुलाबी पट्ट्यांचा रंगीबेरंगी शर्ट, निळ्या रंगाची फुल पँट आणि तांबड्या रंगाची चप्पल होती. त्यानंतर सचिन वाळुंज यांनी तात्काळ खेड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत खाली आणले आणि ते चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत्यूचे कारण गळफास असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलीस तपास..
मृत व्यक्ती अनोळखी असल्याने (नाव, पत्ता काहीही माहीत नाही) पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, आसपासच्या लोकांची विचारपूस आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. कंटेनर क्रमांक HR 55 AK 3283 हरियाणा राज्याचा असून, त्याचा मालक किंवा चालक यांच्याशी संपर्क साधण्याचे काम चालू आहे.
खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, अनोळखी व्यक्तीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.