Commemorating Ajit Dada Pawar | खेड तालुक्याच्या विकासात स्व. अजितदादा पवार यांचे योगदान अविस्मरणीय

खेड तालुक्याच्या विकासात स्व. अजितदादा पवार यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करत माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बुट्टे पाटील यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन केले.

Commemorating Ajit Dada Pawar | खेड तालुक्याच्या विकासात स्व. अजितदादा पवार यांचे योगदान अविस्मरणीय

 

खेड तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्व. अजितदादा पवार यांचे अतिशय मोठे योगदान आहे. स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या मागणीवरून आणि शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले होते. तांत्रिक अडचणी आणि ठेकेदार यांची आर्थिक अडचण यामध्ये रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्व. अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला.


मी कृषी सभापती म्हणून कार्यरत असताना तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन खासदार अशोकअण्णा मोहोळ यांना पाळू येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन करून पाईट येथील शेतकरी मेळाव्यास आणले होते. त्यावेळी हा विषय पुढे आला. 2004 मध्ये आमदार झालेल्या दिलीपअण्णा मोहिते पाटील यांनी या कामी अधिक पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प पूर्ण झाला.,अजितदादांनी स्वतः धरणावर येऊन या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. म्हणून तर आज भामा खोऱ्यातील शेती बारमाही बागायत झाली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले या पट्ट्यातला पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटला.

 


भामा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या त्यागामुळे आज या भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी आणि चाकण नगरपरिषदा, अनेक गावे आणि चाकण इंडस्ट्री देखील पिण्याच्या पाण्यासाठी वापरत आहेत. या पाठीमागे निश्चितच अजितदादा पवार यांची पुण्याई आहे. हिंजवडी आयटी पार्क प्रमाणे चाकण परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणच्या तरुणाईने केलेल्या आंदोलनाला साथ देत अजितदादा पवार सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भल्या पहाटे पुणे नाशिक रोड आणि शिक्रापूर तळेगाव रस्त्यावर आले. 


अतिशय बारकाईने पाहणी करत तातडीने या दोन्ही रस्त्यावरील चौकांचे रुंदीकरण करण्यासाठी 50 हून अधिक कोटी रुपये दादांनी तातडीने दिले. त्यामुळेच या रस्त्यांवरील चौक आता मोकळा श्वास घेत आहेत. पीएमआरडीएच्या माध्यमातून देखील अजितदादांनी या औद्योगिक पट्ट्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला.
दोन दिवसापूर्वी गडकरी साहेबांनी पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचे भूमिपूजन केले. आमचे नेते अजितदादा पवार आज जर असते तर पुणे नाशिक रस्त्याचे देखील याच कार्यक्रमात भूमिपूजन झाले असते.

 


स्वर्गीय नारायणराव पवार, दिलीपअण्णा मोहिते पाटील या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणावर खेड तालुक्याला सहकार्य केले. विकास कामासाठी आग्रह आणि आक्रमक राहिलेल्या दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या प्रत्येक मागणीला मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम अजितदादांनी केले. खेड तालुक्यात सर्वाधिक निधी या काळामध्ये आला. त्यामुळेच खेड तालुक्यात उभे राहिलेल्या सार्वजनिक इमारती, नदीवरील मोठे पूल, रस्त्यांची मोठी कामे, खेड, चाकण, आळंदी ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती आणि त्यांचा विस्तार, पोलीस खात्याच्या इमारती, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, साठवण बंधारे आणि पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अशा शेकडो कामांना कोट्यवधी रुपये देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले.


जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या माध्यमातून आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून गावोगावच्या जन सुविधांसाठी कोट्यावधी रुपये उपलब्ध करून दिले. काल केलेले काम आज आपण बऱ्याच वेळा विसरतो पण ज्याने आपल्या तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिले त्यांचे स्मरण आपण केलेच पाहिजे. काही महिन्यांपूर्वी खेडचे तात्कालीन गटविकास अधिकारी आणि आत्ताचे यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी अजितदादांनी खेड तालुक्यातल्या अनेक आठवणी जागवल्या होत्या आणि एकाच दिवशी अकरा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन आपण राज्यमंत्री असताना केल्याची आठवण त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितली होती.

 

 

माझ्यासह निर्मलाताई पानसरे, सुरेशराव गोरे, अरुणशेठ चांभारे, अश्विनीताई मोरमारे यांना जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी करून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला अधिक पाठबळ देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले. खेड तालुक्यामध्ये आलेल्या संकटाच्या काळात अजितदादा नेहमीच संकटग्रस्तांच्या मागे उभे राहिले. निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी त्यांनी शिवे, वहागाव,धामणे या परिसराचा प्रत्यक्ष दौरा केला आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाई शेतकरी कुटुंबांना मिळवून दिली. सार्वजनिक इमारती दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. कुंडेश्वर दुर्घटनेमध्ये प्रचंड मोठा प्रसंग पाईट पापळवाडी येथील कुटुंबांवर आल्यानंतर अजितदादा पवार यांनी आपले स्वीय सहाय्यक यांना प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि सर्व यंत्रणेला मदत करण्याच्या सूचना केल्या. 


या सर्व जखमी महिलांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचाराचा देखील सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून अजितदादांनी मिळवून दिला. मृत महिलांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. आपल्या कुटुंबावरचा प्रसंग आहे याप्रमाणे अजितदादांनी अतिशय व्यक्तिगत लक्ष घालून या सर्व अडचणीतल्या माणसांना साथ देण्याचे काम केले. अजितदादा खेड तालुक्यात अनेक वेळा आले. अनेक कामांचा शुभारंभ त्यांनी केला, महत्त्वाच्या बैठका घेतल्या. विलासराव देशमुख मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी असलेल्या प्रचंड घाई मध्ये देखील आपले अनुयायी सोपानराव वाळुंज यांचे दुःखद निधन झाल्यानंतर अजितदादा एकटेच खाजगी गाडी घेऊन थेट सोपान वाळुंज यांचे घरी आले होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी सुख दुःखात साथ दिली आणि सहकार्य केले.

 

 

माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अजितदादांमुळे झाली. 1998 मध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना स्वर्गीय नारायणराव पवार यांच्याबरोबर माझ्या वराळे गावी येऊन त्यांनी माझ्या साप्ताहिक खेड वार्ता चे प्रकाशन केले होते. त्यानंतर 1999 मध्ये मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद, 2002 मध्ये पुणे जिल्हा परिषदेला उमेदवारी आणि निवडून गेल्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद देण्याचे काम त्यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणच्या सिनेटवर देखील त्यांनी मला काम करायची संधी दिली. 2007 मध्ये पक्षाचा सभागृहातील गटनेता म्हणून पुणे जिल्हा परिषद मध्ये त्यांनी दिलेल्या संधीच्या माध्यमातून मी सर्वाधिक उजवी काम करून दाखवले.


भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर देखील त्यांनी माझा कधीच दुसवास केला नाही उलट पक्षी जिल्हा नियोजन समितीवर मी उप समितीचा अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाबद्दल भर बैठकीत दादांनी चांगले मत मांडले. अजितदादा पालकमंत्री असताना मी दिलेले प्रस्तावित कामांना त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. मी भाजपाचा जिल्हाध्यक्ष असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात आल्यानंतर त्यांनी आवर्जून माझ्या कार्यालयाला भेट दिली.अनेक जाहीर सभांमधून त्यांनी शरद माझा जवळचा सहकारी असल्याचे बोलून दाखवले होते.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक मध्ये माझ्या मतदारसंघाचे अनेक तुकडे करण्यात आले. 


या अडचणीमध्ये मला साथ देऊन माझ्या मतदारसंघ आहे तसा करून देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम दादांनी करून दिले. जिल्हा परिषदेच्या कामात तू मला माझ्याबरोबर हवा आहेस या आग्रहाने त्यांनी मला पुन्हा स्वगृही घेण्याची सूचना केली. या संबंधाने माझ्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना चर्चेसाठी खूप मोठा वेळ त्यांनी दिला. माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला येणारे, चर्चेला वेळ देणारे, विकास कामे मार्गी लावणारे आणि थेट संवाद ठेवणारे अजितदादा हे प्रचंड कार्यक्षम आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेतृत्व आम्ही अनुभवले.

 


जिल्हा परिषद मतदार संघ राखीव झाल्यानंतर, शरद तू आता पक्षाच्या कामासाठी राज्यभर फिरले पाहिजे. ग्रामीण विकास आणि पक्ष संघटना या दोन्ही पातळीवर तुला काम करायचे आहे याबद्दल त्यांनी मला बोलावून सांगितले होते.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असंख्य कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे, घडवण्याचे आणि पाठबळ देण्याचे काम अतिशय मनापासून अजितदादांनी केले. विधायक विचाराची, कार्यक्षम पिढी घडवण्याचं काम अतिशय ताकतीने घडवणारे अजितदादा हे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते.

 

 प्रशासनावर वचक असलेला त्यांचा सारखा दुसरा नेता होणे अवघड आहे. अजितदादांना अजून पंधरा-वीस वर्ष मिळाले असती तर त्यांनी महाराष्ट्र पुढे नेला असता आणि विधायक पण स्पष्ट, गतिमान पण अचूक राज्यकारभार कसा करायचा असतो हे देशभराला दाखवून दिले असते. खरंतर अजितदादांचा आज वाढदिवस आम्ही जयंती म्हणून साजरा करत आहोत हे आमचे दुर्दैवच आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांना या जयंती दिनी अतिशय जड अंतकरणाने भावपूर्ण अभिवादन.

• शरद आनंदराव बुट्टे पाटील,
माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती पुणे जिल्हा परिषद