World Physics Games in Bali | वर्ल्स चॅम्पियन शरीरसौष्ठव स्पर्धेत पाईट-रौंधळवाडी गावचा सुपुत्र सुधीर रौंधळ याने सुवर्णपदक जिंकत विश्वविजेतेचा ठरला
क्लासिक फिजिक्स स्पर्धेत सुवर्णपदक, एकाच दिवशी प्रो क्वालिफाय, प्रो कार्ड आणि वर्ल्ड चॅम्पियन बनले
महावार्ता लाईव्ह | इंडोनेशियातील बाली येथे १२ ते १४ जून २०२६ या कालावधीत आयोजित झालेल्या प्रतिष्ठित वर्ल्ड फिजिक्स गेम्स (ICN International) या नैसर्गिक शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे जिल्हाच्या खेड तालुक्यातील पाईट- रौंधळवाडी गावचे सुपुत्र सुधीर दत्तात्रय रौंधळ यांनी क्लासिक फिजिक्स या कॅटेगरीत सुवर्णपदक जिंकून विश्वविजेतेपद पटकावले आहे.
सुधीर रौंधळ हे या स्पर्धेत भाग घेणारे जगातील पहिले खेळाडू ठरले आहेत, त्याने पहिल्यांदाच क्लासिक फिजिक्स स्पर्धेत भाग घेतल्यावर एकाच दिवशी प्रो क्वालिफाय, प्रो कार्ड आणि वर्ल्ड चॅम्पियन हा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाने भारताच्या नैसर्गिक शरीरसौष्ठव क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्हा व महाराष्ट्र आणि देशभरात त्याचे अभिनंदन होत आहे.
प्राईम प्लाजा कन्व्हेन्शन सेंटर, बाली येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील नैसर्गिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग होता. ही स्पर्धा पूर्णपणे नॅचरल (डोपिंग-मुक्त) शरीरसौष्ठवाला प्रोत्साहन देणारी मानली जाते. भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत क्लासिक फिजिक्स, प्रो बॉडी बिल्डिंग आणि मास्टर्स अशा विविध कॅटेगरींमध्ये सुवर्ण, रौप्य पदके तसेच मानाचे प्रो-कार्ड मिळवले.सुधीर रौंधळ यांनी क्लासिक फिजिक्स कॅटेगरीत आपल्या आकर्षक शरीररचने, सौष्ठव आणि स्टेज प्रेझेंटेशनने न्यायाधीशांचे मन जिंकले. त्यांच्या तयारीमागे वर्षानुवर्षांची मेहनत, कठोर आहार नियोजन आणि प्रशिक्षण,मार्गदर्शन हेच मुख्य होते.
गावाचा अभिमान, जिल्ह्याचा गौरव
पाईट- रौंधळवाडी या छोट्याशा गावातील सुधीर यांचे हे यश गावाच्या मानपेचात मनाचा तुरा रोवणारे ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पुणे जिल्हा, खेड तालुका आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक हितचिंतक, खेळप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सुधीर यांचे अभिनंदन केले आहे. अनेक ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सुधीर यांच्या यशाने तरुण पिढीला प्रेरणा मिळाली आहे. नैसर्गिक शरीरसौष्ठवात डोपिंगशिवाय कठोर मेहनतीने यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
सुधीर रौंधळ यांचे योगदान
सुधीर दत्तात्रय रौंधळ हे ग्रामीण भागाच्या गावातून आलेले एक साधारण तरुण असून, त्यांनी आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार आहे.
खेड तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी,नेते आणि खेळप्रेमी म्हणाले, “सुधीरने केवळ व्यक्तिगत यश मिळवले नाही तर त्याच्या या खेळाने संपूर्ण खेड तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा गौरव केला आहे.सुधीर रौंधळ यांनी भावी काळात आणखी मोठे यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व क्षेत्रातून शुभेच्छासह अभिनंदन होत आहे.