Khed Panchayat Samiti Election | शिवसेना उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी,थेट राजकीय संघर्ष; सभापती-उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक
खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार. ठाकरे गटाकडून गौरी मुऱ्हे आणि दिलीपराव डुबे यांची नावे चर्चेत; अजित पवार गट काय रणनीती आखणार?

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीतच खेड तालुक्याच्या स्थानिक राजकारणात मोठा राजकीय संघर्ष उभा ठाकला आहे. खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनी ठरल्यानुसार आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या (उद्या ) सोमवारी, ५ तारखेला सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक खेड पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे. या निवडीच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट सामना होणार असल्याने सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे.
मागील निवडणुकीत ९ विरुद्ध ७ अशी चुरस
एकूण १६ सदस्य संख्याबळ असलेल्या खेड पंचायत समितीत सत्ता समीकरणांची गणितं अत्यंत संवेदनशील आहेत. मागील निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळाली होती. त्यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विद्या मोहिते (सभापती) आणि मंगेश सावंत (उपसभापती) यांनी प्रत्येकी ९ मते मिळवत सत्ता राखली होती. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी तरस (सभापती उमेदवार) आणि निखिल थोरवे (उपसभापती उमेदवार) यांना प्रत्येकी ७ मतांवर समाधान मानावे लागले होते. केवळ दोन मतांच्या फरकाने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हुकली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस झालेला पराभव धुवून काढणार का याकडे तालुक्यातील राजकीय जाणकार यासह जनतेचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत ऐनवेळी समिकरणांची काय घडामोड होते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
ठाकरे गटाचे सदस्य १२ दिवसांपासून 'सहलीवर'; मुऱ्हे व डुबे रिंगणात
आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाने पूर्ण ताकद पणाला लावली असून फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी सदस्यांना गेल्या १२ दिवसांपासून सुरक्षित स्थळी सहलीवर पाठवण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारीची रणनीती निश्चित करण्यात आली असून सभापती पदासाठी कुरुळी गणातून निवडून आलेल्या सदस्या गौरी चंदन मुऱ्हे आणि उपसभापती पदासाठी रेटवडी गणातून निवडून आलेले सदस्य दिलीपराव डुबे या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून ऐनवेळी काही बदल होणार का हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपले ९ सदस्यांचे संख्याबळ अखंड राखून दुसऱ्यांदा विजय मिळविण्याचा ठाकरे गटाचा स्पष्ट इरादा आहे. कविता राक्षे, प्रसाद घेनंद, सारिका गोगावले यांचीही नावे चर्चेत असल्याची चर्चा आहे. राजकारणात ऐनवेळी काहीही होऊ शकते हे तितकेच सत्य आहे.
राष्ट्रवादी राजकीय चमत्कार घडवणार का?
मागील निवडणुकीची समीकरणे पाहता राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गोपनीय हालचाली सुरू आहेत. अवघ्या दोन मतांच्या फरकाने गेल्या वेळी सत्ता गमावलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यंदा कोणतीही कसर सोडण्याच्या तयारीत नाही. ९ विरुद्ध ७ असे संख्याबळ कागदावर ठाकरे गटाच्या बाजूने असले, तरी अंतर्गत नाराजी, गुप्त मतदान किंवा ऐनवेळच्या राजकीय हालचालींचा फायदा उठवत अजित पवार गट चमत्कार घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संख्याबळ टिकविण्याचे आव्हान?
संख्याबळ टिकवून सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान शिवसेना ठाकरे गटासमोर असून, अजित पवार गटाच्या रणनीतीमुळे ही निवडणूक अधिक अटीतटीची आणि रंगतदार ठरण्याची दाट शक्यता आहे.येत्या सोमवारी मतदानाने होणाऱ्या खेड पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार, याचा फैसला होणार आहे.सेनेकडे बहुमत असल्याने त्यांचा झेंडा फडकेल असेच चित्र आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ऐनवेळी कोणती खेळणार याकडे लक्ष वेधले जाणार आहे.