गणेश मंडळांनी रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी; शाडूच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे - तहसीलदार प्रशांत बेडसे
आगमन-विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी ; रस्त्यावरील खड्डे, विद्युत तारा, सीसीटीव्ही आणि विसर्जन व्यवस्थेबाबत संबंधित विभागांना पोलीस उपधिक्षक अमोल मांडवे यांच्या सूचना
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी मांडव उभारताना रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसविण्यास विशेष प्राधान्य द्यावे. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून खेड तालुक्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले.
गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर शहरातील गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, बाजारपेठ तसेच गणेश मंडळांच्या परिसराची पोलीस व प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली. गणेशोत्सव काळात नागरिक व गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच आगमन व विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना केल्या.
गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची पाहणी करताना रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, मिरवणुकीच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा व इतर अडथळे दूर करणे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेश मंडळांसमोर सीसीटीव्हीची व्यवस्था
गणेश मंडळांसमोर तसेच गर्दीच्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यावर तातडीने लक्ष ठेवता यावे, यासाठी सीसीटीव्ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
मांडव उभारताना वाहतुकीची काळजी
गणेश मंडळांनी मांडव उभारताना रस्ते, चौक किंवा प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. मांडवाची उभारणी करताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि नागरिक तसेच वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शाडूच्या मूर्तींना प्राधान्य
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींना विशेष प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेऊन गणेश मंडळांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी स्पष्ट केले.
वाहतूक व विसर्जन व्यवस्थेसाठी समन्वय
गणेशोत्सवाच्या काळात आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. मिरवणूक मार्गावरील अडथळे वेळेत दूर करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना करणे तसेच विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मांडव उभारणी, मिरवणूक, वाहतूक, ध्वनिक्षेपक, सुरक्षितता आणि विसर्जन व्यवस्थेबाबत लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
पाहणीमध्ये अधिकारी उपस्थित
गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, चेतन मोरे, खेड पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दाणे, जाधव, विद्युत विभागाचे मंचरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, नगरपरिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, नगरपरिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.