राजगुरूनगरात गणेशोत्सव बैठक: नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

गणेशोत्सवात लेझर लाईट आणि आक्षेपार्ह फलकांवर पूर्ण बंदी; डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा पोलिसांचा इशारा. महावितरण २४ तासांत देणार तात्पुरते मीटर कनेक्शन.

राजगुरूनगरात गणेशोत्सव बैठक: नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

 

महावार्ता लाईव्ह | आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पडावा यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत लेझर लाईटवर बंदी, डीजेच्या नियमांचे पालन, वाहतूक कोंडी, विसर्जन व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली.

 

बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे म्हणाले की, "डीजेच्या वापराबाबत शासन आणि न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नियम शहर आणि ग्रामीण भागासाठी सारखेच लागू राहतील. लेझर लाईटचा वापर आढळल्यास कारवाई केली जाईल. तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी सर्व गणेश मंडळांनी आपापल्या मंडपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शहरातील विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली असून आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत."

 

पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, मंडळांनी मंडप व डीजेसाठी पूर्वपरवानगी घ्यावी. मंडपामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता बाळगावी. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह बोर्ड अथवा बॅनर झळकवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मूर्ती आणि देखावे पर्यावरणपूरक असावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

 

महावितरणचे अधिकारी उत्तम मंचरे यांनी मंडळांना तात्पुरत्या मीटर कनेक्शनसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. विजेचे आकडे टाकून वीज चोरी करू नये, अधिकृत अर्ज केल्यास २४ तासांत मीटर कनेक्शन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी विसर्जन काळात मूर्तीची काळजी घेणे, प्रदूषण नियंत्रण आणि डीजेच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या.

 

नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी उत्सव काळात मद्यपींचा उपद्रव रोखणे आणि खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात विशेष बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते माणिक होरे यांनी गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचा बंदोबस्त करणे व विसर्जन मार्गावरील लोंबकळणाऱ्या वीज तारांचे नियोजन करण्याची मागणी केली.

 

तसेच तिन्हेवाडी येथे विसर्जन व्यवस्थेसाठी नगरपरिषदेने सुविधा पुरवाव्यात आणि शिरोली येथील गणपती कारखान्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी संबंधित पोलीस पाटलांनी केली. याप्रसंगी शिवसेना नेत्या विजया शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

या बैठकीस पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, नायब तहसीलदार चेतन मोरे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, महावितरणचे अधिकारी उत्तम मंचरे, शिवसेना नेत्या विजया शिंदे, पोलीस पाटील अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मछिंद्र मुळूक यांनी केले, तर पोलीस हवालदार संतोष घोलप यांनी आभार मानले.