एक वर्षापासून फरार आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
एक वर्षापासून फरार आरोपी अदित्य उर्फ गुड्या बबन नवले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
महावार्ता लाईव्ह | गेल्या एक वर्षापासून विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर ताब्यात घेतले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या खेड पथकाने ही कारवाई केली.
जाहिरात

गुन्हे शाखेच्या खेड पथकातील पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार अदित्य उर्फ गुड्या बबन नवले (वय २४, रा. मोरेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हा आरोपी आंबेगाव तालुक्यातील एका महादेव मंदिराच्या पाठीमागे बसलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अदित्य उर्फ गुड्या बबन नवले याच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाणे व खेड पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हे दाखल आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक शुभम कुमार, पोलीस कर्मचारी अमोल मांडके, सहा.पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, भारत मोहोळ आणि चेतन पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.