ग्रामविकासदूत कार्यकर्ता कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११५ कार्यकर्त्यांना ७० हून अधिक योजनांचे मार्गदर्शन
पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटातील ११५ कार्यकर्त्यांसाठी वराळे येथे ग्रामविकासदूत कार्यकर्ता कार्यशाळा; ७० हून अधिक शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन
महावार्ता लाईव्ह | केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजना खऱ्या अर्थाने गरजू, गरीब व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांसाठी वराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात ‘ग्रामविकासदूत कार्यकर्ता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला जिल्हा परिषद गटातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध योजनांसाठी गावपातळीवर काम करणारे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत ११५ महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. विविध शासकीय योजनांचे एकत्रीकरण करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावपातळीवर प्रशिक्षित कार्यकर्त्यांची निवड करून अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जाहिरात

कार्यशाळेत कार्यकर्त्यांना ७० हून अधिक वैयक्तिक, सामूहिक, आरोग्यविषयक व विमा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावपातळीवर सर्वेक्षण करणे, गरजू लाभार्थ्यांची यादी तयार करणे, आवश्यक कागदपत्रांचे संकलन करणे, अर्ज व फॉर्म अचूक भरून घेणे आणि निर्धारित मुदतीत ते संबंधित विभागाकडे दाखल करणे या संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अनेकदा काही मोजकेच लाभार्थी विविध योजनांचा वारंवार लाभ घेतात; मात्र खरोखरच गरजू असलेले नागरिक माहितीअभावी किंवा प्रक्रियेतील अडचणींमुळे योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे ‘योजना लाभार्थ्यांकडे येण्याची वाट न पाहता ग्रामविकासदूतांनी गरजू लाभार्थ्यांचा शोध घ्यावा’, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.
शेतकरी, शेतमजूर, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती, वृद्ध कलावंत, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक समाजातील नागरिक, विद्यार्थी, किशोरवयीन मुली यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर महिला स्वयंसहायता बचत गट, शेतकरी बचत गट, महिला मंडळे आणि युवक मंडळांसाठी उपलब्ध असलेल्या सामूहिक लाभांच्या योजनांचीही माहिती देण्यात आली.
वैयक्तिक लाभांच्या योजनांबरोबरच आजारपणाच्या काळात आर्थिक संकटात सापडणाऱ्या कुटुंबांसाठी उपलब्ध आरोग्यविषयक योजना, वैद्यकीय मदत योजना आणि विमा योजनांवर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना उपचारासाठी कर्ज किंवा उसनवारी करावी लागू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी अशा योजनांची माहिती गरजू रुग्णांपर्यंत तातडीने पोहोचवावी, असेही सांगण्यात आले.
या कार्यशाळेत प्रत्येक कार्यकर्त्याला ७० हून अधिक योजनांची माहिती असलेले ‘ग्रामविकासदूत’ पुस्तक तसेच विविध योजनांचे आवश्यक अर्ज व फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. या साधनांचा उपयोग करून प्रत्येक गावात अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना आलेले अनुभवही कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आले. संदीप काचोळे, संतोष कावडे, चंद्रकांत शिंदे, वैशाली काळे, सुरेश आहेरकर आणि सिद्धार्थ कोहिनकर यांनी आपले अनुभव कथन करत प्रत्यक्ष कामातील अडचणी, उपाय आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
तसेच स्वप्निल सानप यांनी SIR संदर्भात गावपातळीवर कार्यकर्त्यांनी करावयाच्या कामाची तसेच संबंधित ॲपच्या वापराची माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक दत्तात्रय मांडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील देवकर यांनी केले, तर आभार जयसिंग दरेकर यांनी मानले. ग्रामविकासदूतांच्या माध्यमातून शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता थेट गरजूंच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यशाळेतून व्यक्त झाला.