डॉ. सुधा कोठारी यांना ‘स्वर्गीय कांचनताई परुळेकर स्मृती गौरव प्रथम पुरस्कार’ प्रदान
१९९३ मध्ये त्यांनी चैतन्य संस्थेची स्थापना केली. गेल्या ३३ वर्षांत चैतन्यने महिला बचत गट, महिला संघटना, आर्थिक समावेशन, महिला उद्योजकता, शाश्वत उपजीविका आणि लिंग समानता या क्षेत्रांत अग्रगण्य कामगिरी केली
महावार्ता लाईव्ह | महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल चैतन्य संस्थेच्या संस्थापक विश्वस्त डॉ. सुधा कोठारी यांना स्वयंसिद्धा ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यातर्फे प्रतिष्ठेचा ‘स्वर्गीय कांचनताई परुळेकर स्मृती गौरव प्रथम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार १५ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मानपत्र व रोख रक्कम एक लाख रुपये १,००,००० देऊन प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमात स्वयंसिद्धा ट्रस्टच्या कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड,अध्यक्ष डी.व्ही.पाटील,सचिव भूमि पुरेकर, गीताताई जाधव, सोन्या शिरोळकर ,अंजली घोरपडे यांच्यासह अनेक विश्वस्त,पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी चैतन्य संस्थेच्या अनेक सदस्या,कार्यकर्ते यासह शिरोळ व करवीर संघांच्या पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान संपूर्ण चैतन्य परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
डॉ. सुधा कोठारी यांचा कार्यप्रवास
डॉ. सुधा कोठारी यांनी १९८८ साली ग्रामीण आणि वंचित महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य सुरू केले. सुरेखा श्रोत्रिय यांच्या सहकार्याने १९९३ मध्ये त्यांनी चैतन्य संस्थेची स्थापना केली. गेल्या ३३ वर्षांत चैतन्यने महिला बचत गट, महिला संघटना, आर्थिक समावेशन, महिला उद्योजकता, शाश्वत उपजीविका आणि लिंग समानता या क्षेत्रांत अग्रगण्य कामगिरी केली आहे.
सध्या मा. सुधाताई, मा. रेखाताई आणि कार्यकारी संचालक मा. कल्पना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्यचे कार्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये विस्तारले आहे. संस्था सध्या १७ जिल्ह्यांतील १३,०७७ बचत गट आणि ४६ संघांच्या माध्यमातून १,४६,७५३ महिलांपर्यंत पोहोचली आहे. महिलांना आर्थिक सक्षम करणे, उद्योजकता विकास करणे आणि मजबूत समुदाय संस्था उभारणे हे चैतन्यचे मुख्य ध्येय आहे.
पुरस्काराचे महत्त्व
स्वयंसिद्धा ट्रस्टने दिलेला हा प्रथम पुरस्कार केवळ डॉ. सुधा कोठारी यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नाही, तर चैतन्यशी जोडलेल्या हजारो महिला सदस्य, समुदाय संस्था, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचाही सन्मान आहे. हा पुरस्कार ग्रामीण महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देणारा ठरला आहे. कार्यक्रमात डॉ. सुधा कोठारी यांनी चैतन्यच्या कार्याची वाटचाल सांगितली आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “हा पुरस्कार एकट्या माझ्या नावे नाही, तर गेल्या तीन दशकांत चैतन्यच्या माध्यमातून सक्षम झालेल्या प्रत्येक महिलेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे.
चैतन्यचे योगदान
चैतन्य संस्था केवळ बचत गट चालवण्यापुरते मर्यादित न राहता महिलांना आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व विकास, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात सातत्याने काम करत आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांनी छोट्या उद्योगांच्या माध्यमातून स्वतंत्र पायावर उभे राहण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
स्वयंसिद्धा ट्रस्टचे अध्यक्ष डी. व्ही. पाटील यांनी डॉ. सुधा कोठारी यांच्या दीर्घकाळातील समर्पित कार्याची प्रशंसा करताना म्हटले की, “ग्रामीण महिलांच्या विकासासाठी जे काम डॉ. कोठारी यांनी केले आहे, ते प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची योग्य दखल घेणारा आहे.” हा पुरस्कार महिला सक्षमीकरण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण ओळख म्हणून पाहिला जात आहे. चैतन्य परिवाराने या यशाचे स्वागत करताना भविष्यातही महिलांच्या उन्नतीसाठी अधिक उत्साहाने कार्य करण्याचे संकल्प व्यक्त केले आहेत.