Khed Goods Theft Case | खेडमध्ये ५.२२ लाखांच्या मालाचा अपहार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेडमध्ये वाहतुकीसाठी दिलेल्या ५ लाख २२ हजार २२९ रुपये किमतीच्या GI साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. मोशी टोलनाक्याजवळ मालवाहू गाडी सोडल्याचे फिर्यादीत नमूद.

Khed Goods Theft Case | खेडमध्ये ५.२२ लाखांच्या मालाचा अपहार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

महावार्ता लाईव्ह | मालवाहतुकीसाठी विश्वासाने सोपविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार २२९ रुपये किमतीच्या औद्योगिक साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी खेड परिसरात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार बाळासाहेब खराबी (वय ४३, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. राहुल भवानीसिंग राजपूत (वय ३३, रा. चमेली चौक, जि. सागर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

 

वाहतुकीसाठी सोपविला होता लाखोंचा माल

फिर्यादी यांच्या मालकीच्या टाटा ११०९ मालवाहू गाडीचा (क्रमांक MH-14-EM-3216) वापर करून वाघजाईनगर, खरबवाडी येथील क्लासिक रूफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून महाळुंगे (ता. खेड) येथील एस. आर. इंटरप्रायझेस कंपनीत माल पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार गाडीमध्ये GI 1.5 MM Accessories हे एकूण ४ हजार ६१० किलो वजनाचे साहित्य भरण्यात आले होते. या मालाची किंमत ५ लाख २२ हजार २२९ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

माल नियोजित ठिकाणी न पोहोचविल्याची फिर्याद

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, चालकाने वाहतुकीसाठी सोपविलेला माल नियोजित ठिकाणी पोहोचविला नाही. तसेच फिर्यादी अथवा संबंधित कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मालाची परस्पर विल्हेवाट लावली. त्यानंतर मालाविना मालवाहू गाडी मोशी टोलनाक्याजवळ सोडून दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मालाच्या ठावठिकाणाबाबत माहिती न देता फिर्यादी यांच्याशी संपर्क टाळल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.


या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी सोपविण्यात आलेल्या साहित्याचा ठावठिकाणा तसेच या प्रकरणातील पुढील तपासाबाबत पोलीस करत आहे.