Khed Farmer Assault Case | खेडमध्ये रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; लाकडी फांदीने डोक्यावर वार

दौंडकरवाडी परिसरात रस्त्याच्या माहितीवरून झालेल्या वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण ; उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल.

Khed Farmer Assault Case | खेडमध्ये रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; लाकडी फांदीने डोक्यावर वार

 

महावार्ता लाईव्ह | रस्ता विचारण्यावरून झालेल्या वादातून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला दोघांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी फांदीने मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील दौंडकरवाडी परिसरात घडली. या मारहाणीत शेतकरी जखमी झाला असून, याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भाऊसाहेब विठ्ठल दौंडकर (वय ५५, व्यवसाय शेती, रा. दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वैभव दत्तात्रय दौंडकर (रा. कनेरसर, ता. खेड) आणि सुजित दिलीप अमराळे (रा. अमराळे वस्ती, दावडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन व्यक्ती मोटारसायकलवरून फिर्यादीजवळ आले. त्यांनी दावडीकडे जाणाऱ्या रस्त्याची माहिती विचारली. त्यावर फिर्यादीने रस्ता दावडीकडे जात असल्याचे सांगून अंतर सुमारे तीन किलोमीटर असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर रस्त्याच्या माहितीवरून गैरसमज झाल्याने वाद निर्माण झाला.

 

या वादातून दोघांनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादी खाली पडले आणि त्यांच्या डाव्या गालावर खरचटले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. काही वेळाने सायंकाळी सुमारे पावणेसहाच्या सुमारास फिर्यादी आरोपींच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण का केली, अशी विचारणा केली. यावरून पुन्हा वाद झाला.

 

त्यानंतर आरोपींनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची लाकडी फांदी तोडून फिर्यादीच्या डोक्यावर, कपाळाजवळ तसेच ओठ व दातांवर वार केले. या मारहाणीत फिर्यादीच्या ओठाला दुखापत झाली असून दात तुटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्तर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.