खेड पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या राजीनाम्यानंतर, अमोल नलावडे यांच्याकडे सभापतीपदाचा पदभार
खेड पंचायत समितीच्या आढावा बैठकीचे अध्यक्षपद अमोल नलावडे यांच्याकडे ; बुधवारी खातेप्रमुखांच्या कामांचा आढावा
महावार्ता लाईव्ह | खेड पंचायत समितीचे सभापती विद्या मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने बुधवारी (दि. ३०) रोजी होणारी खेड पंचायत समितीची आढावा बैठक आता जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खेड पंचायत समितीचे सभापती म्हणून अमोल नलावडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
खेड पंचायत समितीवर सध्या शिवसेना (उबाठा) पक्षाची सत्ता आहे. या पक्षाच्या सभापती विद्या मोहिते यांनी सभापतीपदाचा, तर मंगेश सावंत यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाचा पदभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांच्याकडे सोपविला आहे.
त्यामुळे बुधवारी (दि. ३०) होणाऱ्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सभापती म्हणून अमोल नलावडे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अनुभवी सभापती म्हणून नलावडे खातेप्रमुखांकडून विविध विभागांच्या कामांचा कोणत्या पद्धतीने आढावा घेतात, तसेच रखडलेल्या कामांबाबत कोणत्या सूचना करतात, याकडे पंचायत समितीच्या वर्तुळासह तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांचा मुद्दा महत्त्वाचा
सरकारने राज्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून त्यामध्ये खेड तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा मुद्दा आढावा बैठकीत महत्त्वाचा ठरणार आहे.
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार का, याकडे शेतकरी आणि तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही आढावा बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
१३ विभागांच्या कामांचा घेतला जाणार आढावा
खेड पंचायत समितीच्या आढावा बैठकीत शिक्षण, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, पशुसंवर्धन, आरोग्य, निर्मल भारत, परिवहन, महावितरण आदी एकूण १३ विभागांचे खातेप्रमुख तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विभागांकडून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा, योजनांच्या अंमलबजावणीचा तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
तालुक्यातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, नागरिकांच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि विभागनिहाय प्रलंबित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणत्या विभागाला कोणत्या सूचना दिल्या जातात, याकडेही लक्ष राहणार आहे.
पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीकडेही लक्ष
दरम्यान, शिवसेना पक्षाचे पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर गेले असल्याने बुधवारी होणाऱ्या आढावा बैठकीला यापैकी किती सदस्य उपस्थित राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सभापती आणि उपसभापतींच्या राजीनाम्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभापती नलावडे यांनी मानले आभार
खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाची संधी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली आहे. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल अमोल नलावडे यांनी वीरधवल जगदाळे आणि विवेक वळसे पाटील यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, खेड पंचायत समितीच्या सभापटलावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून अमोल नलावडे यांचे नाव सभापती म्हणून झळकणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या आढावा बैठकीत नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या कामकाजाचा कशा पद्धतीने आढावा घेतला जातो आणि कोणत्या महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.