टाकळकरवाडीच्या 'पोलीस पाटलाचा' पदभार काढून घेतला; शासकीय ठेकेदार म्हणून काम केल्याचा ठपका
पोलीस पाटील आणि शासकीय ठेकेदारीचा मुद्दा चर्चेत; पोलीस पाटलाचा पदभार काढला
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावचे पोलीस पाटील अजय नरहरी टाकळकर यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबाबत आणि प्राप्त गंभीर तक्रारींची दखल घेऊन खेड विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांताधिकारी) अनिल दौंडे यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यांच्याकडील टाकळकरवाडी गावचा पोलीस पाटील पदाचा पदभार काढून घेतला आहे.
तसेच त्यांच्याकडील जऊळके खुर्द या गावचा असलेला अतिरिक्त पोलीसपाटील पदाचा पदभार देखील काढून घेतला.करंजविहिरे गावचे पोलीस पाटील सचिन मरगज यांचा पोलीस पाटील पदाचा पदभार काढून त्यांना सेवेतून निलंबित केल्यानंतर आता टाकळकरवाडीचे पोलीस पाटील अजय नरहरी टाकळकर यांचाही पदभार काढल्याने प्रांताधिकारी यांच्या या कडक धोरणात्मक निर्णयाचे खेड तालुक्यात स्वागत होत आहे.
अजय नरहरी टाकळकर हे टाकळकरवाडी गावचे पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना शासकीय ठेकेदार म्हणून काम करत असल्याचा आरोप असून,या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडील टाकळकरवाडी आणि जऊळके खुर्द या दोन्ही गावचा पोलीस पाटील पदाचा पदभार काढल्याचा आदेश ७ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय दंडाधिकारी (प्रांताधिकारी) अनिल दौंडे यांनी जारी केला आहे.आदेशामध्ये महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ तसेच कार्यालयीन सुनावणीचा संदर्भ देण्यात आला आहे.
अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार, अजय नरहरी टाकळकर हे टाकळकरवाडी येथे पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना शासकीय नियमांचे उल्लंघन करून शासकीय ठेकेदार म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. त्यांच्याकडे शासकीय ठेकेदार म्हणून GST नोंदणी क्रमांक असल्याचा मुद्दाही आदेशात नमूद करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी यांचेकडे या प्रकरणी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून प्राप्त झालेला तक्रार अर्ज तसेच टाकळकरवाडीचे रहिवाशी भरत गेनभाऊ टाकळकर यांनी १८ जून २०२६ रोजी सादर केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पोलीस पाटील अजय टाकळकर यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पोलीस पाटील पदाच्या कर्तव्याबाबत कार्यालयीन स्तरावर सुनावणी घेण्यात आली.
आदेशात नमूद केल्यानुसार, अजय टाकळकर यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती २६ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या शासकीय ठेकेदार म्हणून काम करण्याबाबत आणि त्यासंदर्भातील कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली.त्यांच्या खुलाशाचा तसेच उपलब्ध कागदपत्रांचा विचार केल्यानंतर त्यांच्या इतर व्यावसायिक बाबींमुळे पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आदेशात प्रांताधिकारी यांच्याकडून नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस पाटील हे गावातील महसूल व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचे पद असल्याने या पदावर कार्यरत व्यक्तीने इतर व्यावसायिक काम करताना शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजय टाकळकर यांना पोलीस पाटील पदावरून दूर करून पदभार काढून घेतला.
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मधील अधिकारांचा वापर करून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी अजय नरहरी टाकळकर यांचा टाकळकरवाडी येथील पोलीस पाटील पदाचा पदभार चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून घेतला. अजय टाकळकर यांचा पोलीस पाटील पदाचा पदभार काढल्याबाबत या आदेशाची प्रत राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, खेडचे तहसीलदार, टाकळकरवाडी आणि जऊळके खुर्द ग्रामपंचायत यांना माहिती व पुढील कार्यवाही करीता पाठविण्यात आली आहे.पोलीस निरीक्षकांना आदेशाची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर अजय टाकळकर यांच्यावरील आरोपांबाबत अंतिम प्रशासकीय निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या त्यांचा पदभार काढून घेण्यात आला असला तरी चौकशीअंती पुढील निर्णय काय होतो,याकडे टाकळकरवाडी गावाचे आणि तालुक्याचे लक्ष लागले आहे.