Raut to Meet Shiv Sainiks | सचिन अहिर यांच्या पक्षत्यागानंतर संजय राऊत पुणे जिल्हा दौऱ्यावर; खेडमध्ये शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार?

९ ऑक्टोबरला खेड -आळंदी विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक; जिल्हाप्रमुख रामदास धनवटे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

Raut to Meet Shiv Sainiks | सचिन अहिर यांच्या पक्षत्यागानंतर संजय राऊत पुणे जिल्हा दौऱ्यावर; खेडमध्ये शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार?

 

महावार्ता लाईव्ह | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, ९ ऑक्टोबर रोजी ते खेड तालुक्यातील खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच शिवसेना (उबाठा) पुणे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

 

तत्कालीन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला अचानक ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर खासदार संजय राऊत प्रथमच खेड तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राऊत यांच्या दौऱ्यामुळे खेड तालुक्यातील शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

खेडमधील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक खेड तालुक्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक वाटचाल, पदाधिकाऱ्यांची भूमिका, स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत संजय राऊत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

 

विशेषतः सचिन अहिर यांच्या पक्षत्यागानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राऊत पुणे जिल्ह्यातील, विशेषतः खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना कोणता ‘कानमंत्र’ देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सचिन अहिर यांनी तडकाफडकी शिवसेना (उबाठा) पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली.

 

पुणे जिल्हा संपर्कप्रमुख असताना अहिर यांचे जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते. अहिर उपसभापती होताच त्यांचे अभिनंदन शिवसेनेच्या (उबाठा) काही पदाधिकाऱ्यांनी केले होते.

 

संजय राऊत याविषयी बोलणार का? 

भीमाशंकर येथे मुख्यमंत्री आल्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील आणि बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आम्ही बाबाजी काळे यांना एक प्रपोजल दिले आहे,” असे म्हटले होते. त्यानंतर या ‘प्रपोजल’ची राजकीय चर्चा रंगली होती.

 

तसेच चाकण एमआयडीसीतील वाहतूक समस्येच्या प्रश्नावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे चाकण येथे आले असता, लग्नाचे निमित्त सांगून आमदार बाबाजी काळे हे अर्धा दौरा सोडून निघून गेले होते.

 

त्यानंतरच्या काळात चाकण येथे आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत आमदार बाबाजी काळे हे पूर्णवेळ उपस्थित होते. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत याबाबत काही भाष्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा

संजय राऊत यांच्या पुणे जिल्हा दौऱ्याची सुरुवात ८ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यादिवशी त्यांचे पुणे जिल्ह्यात आगमन आणि मुक्काम राहणार आहे.

 

९ ऑक्टोबर रोजी जुन्नर, मंचर तसेच शिक्रापूर-शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. त्यानंतर खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि पुणे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

 संघटनात्मक बांधणीवर भर?

आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा पुणे जिल्हा दौरा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होण्याची शक्यता आहे.

 

खेड तालुक्यातील बैठकीत स्थानिक राजकारणासह पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत राऊत काय भूमिका मांडतात, मुख्य पदाधिकाऱ्यांना कोणते निर्देश देतात आणि शिवसैनिकांना कोणता संदेश देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.