खेड पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला भाजपाचे निवेदन; दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात लोकप्रतिनिधी व नागरिक एकवटले

खेड पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला भाजपाचे निवेदन; दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

 


यावेळी भाजपा सरचिटणीस अक्षय प-हाड यांनी रस्त्यांच्या कामातील तांत्रिक बाबींची विचारपूस करून तात्काळ दुरुस्तीच्या कामाबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन तालुक्यातील परिस्थितीची माहिती देत आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करू तसेच संबंधित रस्त्यांची एकत्रित पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 


दत्तात्रय सुतार, उपसरपंच आंबोली यांनी निवेदनातील मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मागण्यांवर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा उपस्थितांच्या वतीने देण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, चंद्रकांत शिंदे (सरपंच, गडद), सुमित्रा चांभारे (सरपंच, सुपे), भूषण शिंदे, सतीश टोके (चास), रवींद्र बरसे (सदस्य, बुरसेवाडी) यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.