श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भीमाशंकरमध्ये एकनाथ शिंदेंचा रुद्राभिषेक; मंदिर परिसर विकासासाठी २८८ कोटींचा आराखडा

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पूजा व रुद्राभिषेक केला. मंदिर परिसर विकासासाठी २८८ कोटी, तर भीमाशंकर वाडी पुनर्वसनासाठी १९३ कोटी मंजूर.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भीमाशंकरमध्ये एकनाथ शिंदेंचा रुद्राभिषेक; मंदिर परिसर विकासासाठी २८८ कोटींचा आराखडा

 

महावार्ता लाईव्ह | श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवभक्तांची मोठी गर्दी असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिर्लिंग भगवान भीमाशंकराचे दर्शन घेत विधिवत पूजा आणि रुद्राभिषेक केला. यावेळी त्यांनी भगवान भोलेनाथाच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसह बळीराजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

 

श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना सुख, समाधान, ऐश्वर्य आणि आनंद लाभावा, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावेत आणि बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

 

दरम्यान, भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, या आराखड्यातील प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात मंदिर परिसरातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

 

याशिवाय भीमाशंकर वाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठीही निधी मंजूर करण्यात आला असून, भीमाशंकर परिसराच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाकडून भर दिला जात असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ होती. धार्मिक वातावरणात झालेल्या रुद्राभिषेकावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी आमदार शरद सोनवणे, मावळ लोकसभा सह-संपर्कप्रमुख विकास रेपाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.