Student Health Camp | ज्ञानसंस्कार अभियानातून सुनिता बुट्टे पाटील यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; पाईटमध्ये १८४ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकारातून शैक्षणिक मार्गदर्शन; ९५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुनीता शरद बुट्टेपाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानसंस्कार’ उपक्रमांतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाईट तसेच कुडेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास, चांगले संस्कार आणि जीवनकौशल्ये विकसित करून त्यांना जबाबदार नागरिक बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाईट यांच्या माध्यमातून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात ९५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी, तर १८४ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी शिबिराला भेट दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण जाणून घेणे आणि रक्तगटाची माहिती उपलब्ध करून देणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिक्षण, संस्कार आणि आरोग्य यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमांमुळे पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.