राजगुरूनगरमध्ये स्व. बाळासाहेब आपटे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त नेत्रचिकित्सा शिबिर; २२५ नागरिकांची मोफत नेत्रतपासणी

मोफत चष्मे वाटप, नेत्रदान संकल्प उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

राजगुरूनगरमध्ये स्व. बाळासाहेब आपटे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त नेत्रचिकित्सा शिबिर; २२५ नागरिकांची मोफत नेत्रतपासणी

 

महावार्ता लाईव्ह | राष्ट्रीय नेते, भाजपचे माजी खासदार तथा राजगुरूनगरचे सुपुत्र स्वर्गीय अॅड. बाळासाहेब आपटे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरूनगर येथे नेत्रचिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि नेत्रदान संकल्प या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल २२५ नागरिकांनी सहभाग घेत मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अॅड. बाळासाहेब आपटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. त्यानंतर नेत्रचिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि नेत्रदान संकल्प हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम स्व. बाळासाहेब आपटे स्मृती समिती, लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर आणि राजगुरूनगर शहर व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

 

 

यावेळी राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, राजगुरूनगर बँकेच्या ज्येष्ठ संचालिका विजया शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक दिनेश सांडभोर, निलेश घुमटकर, राजू जाधव, फैज मोमीन, राजगुरू फाउंडेशनचे बाळासाहेब सांडभोर, माजी सरपंच प्रदीप कासवा, स्वानंद खेडकर, राजन जांभळे, विष्णू बोऱ्हाडे, सुशील शिंगवी, राहुल वाळुंज, माणिक होरे, वैभव नाईकरे, पत्रकार सुनील थिगळे, अतुल भालेराव, रामचंद्र सोनवणे यांच्यासह राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगरसेवक-नगरसेविका, राजगुरूनगर बँकेचे संचालक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राजगुरूनगर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल ढवळे यांनी उपस्थित नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व, त्याविषयीच्या गैरसमजुती आणि नेत्रदान संकल्पाची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शिबिर यशस्वी होण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी केले. प्रास्ताविक चंदन खारीवाल यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब खंडागळे यांनी केले.